भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 31, 2012

७७३. द्वावुपायौ इह प्रोक्तौ विमुक्तौ शत्रुदर्शने |

हस्तयो: चलनादेको द्वितीय: पादवेगज: ||

अर्थ

शत्रू दिसल्यावर त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी दोन उपाय सांगितलेले आहेत. एक म्हणजे हातात [शस्त्र घेऊन जोरदार प्रतिकार; चढाई] करणे  आणि दुसरा पाय वेगात पळवणे. [य: पलायते  स जीवति.]

Thursday, August 30, 2012

७७२. गृहं शिशुविवर्जितं विगतभर्तृका बालिका पुरी सततनिर्जला जनपदोऽरिभि: पीडित: |

वनं दवसमाकुलं तरुमनाश्रिता वल्लरी शठः परमधार्मिको मनसि सप्त शल्यानि मे ||

अर्थ

मुल नसलेलं घर; विधवा मुलगी; पाण्याचे वांधे असणार गाव; दुष्ट त्रास देत असलेल ठिकाण; सगळीकडे दवं पसरलेलं अरण्य; झाडाचा आधार न मिळालेली वेल आणि अतिशय धार्मिक असा ठग अशी सात शल्ये माझ्या मनाला बोचतात.  [शशी दिवसधूसरो या श्लोकाचे अनुकरण ]

७७१. शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृते: |

प्रभुर्धनपारायण: सततदुर्गत: सज्जनो नृपाङ्गणगत: खलो मनसि सप्त शल्यानि मे || नीतिशतक भर्तृहरी

अर्थ

दिवस सुरु झाल्यावर फिकट झालेला चन्द्र; तारुण्य निघून गेलेली सुंदरी; कमळे नसलेले तळे; देखण्या माणसाचे अशिक्षित असणे; पैशाच्या मागे लागलेला मालक; नेहमी वाईट स्थितीत गेलेला सज्जन माणूस आणि राजदरबारी असलेला दुष्ट, हे माझ्या मनात [सलत राहणारे] सात काटे आहेत.

७७०. गुणानामुत्कर्षाच्चरणनखजाताऽपि सहसा पुनाना त्रैलोक्यं स्मरहरशिरोभूषणमभूत् |

विवेकभ्रष्टां तां कविरयमुदारो विगणयन्न तस्याः स्वस्यैव प्रकटयति दीर्घामवनतिम्  || मुकुन्दराय

अर्थ

पायाच्या नखापासून उत्पन्न झाली तरी सुद्धा आपल्या गुणांच्या महात्म्यामुळे तिन्ही लोकांची [पाप नष्ट करून त्यांना] पवित्र करणारी [गंगामाता] भगवान शंकराच्या मस्तकावर भूषण होऊन राहिली. तिचा अविचारी असा अपमान करून या फार उदार [?] कवीने तिची नव्हेच तर स्वतःचीच अतिशय अधोगती दाखवून दिली आहे. [ थोड्याशा विनोदी छटेने हा श्लोक रचलेला आहे. भर्तृहरीबद्दल या कवीला चांगला आदर आहे. एखाद्या काव्याच सौंदर्य रसग्रहण करताना काही कवि विडंबनाचा मार्ग चोखाळतात.]

Monday, August 27, 2012

७६९. शिर: शार्वं स्वर्गात्पशुपतिशिरस्त: क्षितिधरं महीध्रादुत्तुङ्गादवनिमवनेश्चा पि जलधिम् |


अधोऽधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमथवा विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख: || नीतिशतक  भर्तृहरी
 
अर्थ
 
ही गंगा नदी स्वर्गातून भगवान शंकराच्या डोक्यावर; शंकराच्या मस्तकावरून [अजून  खाली] पर्वतावर [कोसळली.] त्या अतिशय उंच अशा पर्वतावरून [खाली] पृथ्वीवर आणि तिथूनही समुद्रात अशा रीतिने खाली खालीच घसरत पार रसातळाला गेली. [यातून अस दिसत की ] ज्यांचा विवेक सुटला, त्यांचा अध:पात शेकडो प्रकारांनी होतो.

७६८. कविना कवनं कवनेन कवि: कविना कवनेन विभाति मही |

तरुणा कुसुमं कुसुमेन तरुस्तरुणा कुसुमेन च भाति वनम् ||

अर्थ

कविमुळे काव्य शोभून दिसते. काव्यामुळे कवि [च कौतुक होत] उठून दिसतो. त्या दोघांमुळे पृथ्वीला शोभा येते. झाडामुळे फूल सुंदर दिसतं. फुलामुळे झाडाला शोभा येते आणि त्या दोघांमुळे अरण्य सुंदर दिसतं.

७६७. पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सर: |

मणिना वलयं वलयेन मणि; मणिना वलयेन विभाति कर: ||

अर्थ

पाण्याच्या योगाने कमळ शोभून दिसते. कमळ [फुलल्यामुळे] पाण्याला शोभा येते. पाणी आणि कमळ यांमुळे तळे सुंदर दिसते. रत्नाने बांगडी खुलून दिसते. कंकणामुळे रत्नाला शोभा येते. त्या दोन्ही मुळे हात सुंदर दिसतो.