भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, March 7, 2012

६११. अद्भिः गात्राणि शुध्यन्ति मन: सत्येन शुध्यति |

विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिर्ज्ञानेन शुध्यति ||

अर्थ

शरीर पाण्याने शुद्ध [स्वच्छ] होते, खरे [बोलण्याने] मन शुद्ध होते, [अध्यात्मिक] ज्ञान आणि तपश्चर्या यांनी [जीवाच्या अन्त:करणातील मळ नाहीसा होऊन] आत्मा शुद्ध होतो, ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते.

६१०. अरावप्युचितं कार्यमातिथ्यं गृहमागते |

छेत्तुमप्यागते छायां नोपसंहरते द्रुम: ||

अर्थ

आपल्या घरी जरी शत्रु तरी त्याचा पाहुणचार करावा. झाड तोडणाऱ्याला सुद्धा झाड सावली धरतं. [तो शत्रु असूनही त्याला उन्हात ठेवत नाही.]

Tuesday, March 6, 2012

६०९. यदि न स्यान्नरपति: सम्यङ्नेता तत: प्रजा: |

अकर्णधारा जलधौ विप्लवेतेह नौरिव ||

अर्थ

जर राजामध्ये चांगले नेतृत्वाचे गुण नसतील तर नावाडी नसलेली होडी ज्याप्रमाणे समुद्रात बुडून जाते त्याप्रमाणेच प्रजेची वाताहात होईल.

६०८. उपनिषद: परिपीता गीतापि च हन्त मतिपथं नीता |

तदपि न हा विधुवदना मानससदनात्बहिर्याति ||

अर्थ

[आम्ही] उपनिषदांचा [तत्वज्ञानाचा] सखोल अभ्यास केला; गीता सुद्धा बुद्धीत ठसवली, पण अरेरे ! तरीसुद्धा आमच्या अन्त:करणातून चन्द्रमुखी [सुंदरी; तिचा विचार ] निघून जात नाही.

६०७. ईक्षणं द्विगुणं भुयात्भाषणस्येति वेधसा |

अक्षिणी द्वे मनुष्याणां जिह्वा चैकेव निर्मिता ||

अर्थ

बोलण्याच्या दुप्पट निरीक्षण केले पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवाने माणसांसाठी दोन डोळे आणि एकच जीभ बनवली आहे.

६०६. न स्थातव्यं न गन्तव्यं क्षणमप्यधमै: सह |

पयोऽपि शौण्डिकीहस्ते वारुणीत्यभीधीयते ||

अर्थ

नीच माणसांबरोबर क्षणभर सुद्धा थांबू नये [कारण की] कलालीणीच्या [दारूचा गुत्ता चालवणाऱ्या बाईच्या] हातात दूध असलं तरी [ती] दारु आहे असच म्हटलं जातं.

६०५. जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा: |

नास्ति येषां यशकाये जरामरणजं भयम् ||

अर्थ

ज्यांच्या कीर्ति रूपी शरीराला म्हातारपण किंवा मरण यांची भीती नाही अशा; रसपरिपोष करण्यात कुशल असलेल्या; ज्यांच्या रचना अतिशय सुंदर आहेत अशा श्रेष्ठ कवींचा जय होतो.