भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, July 31, 2013

१०७२. यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिसेवते |

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ||

अर्थ

निश्चित गोष्टी करायच्या सोडून जो अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबाबतीत नक्की पूर्ण होणाऱ्या गोष्टी न केल्यामुळे नाहीशा होतात आणि अध्रुव हे तर घडतच नाही. [त्यामुळे सर्वच शून्य तोट्यात कारभार.]

Monday, July 29, 2013

१०७१. सुखानां स्यात्‌ किमुत्तमं किन्नु त्यक्त्वा सुखी भवेत्?

सुखानां तुष्टिरुत्तमा लोभं त्यक्त्वा सुखी भवेत्‌ ||

अर्थ

कुठलं सुख सर्वात श्रेष्ठ ? कशाचा त्याग केला असता माणूस सुखी होतो ? समाधानी असण हे सर्वात श्रेष्ठ सुख होय लोभ [हाव -आसक्ती ] सोडली की माणूस सुखी होतो

Thursday, July 25, 2013

१०७०. अनाहूत: प्रविशति अपृष्टो बहुभाषते |

अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ||

अर्थ

बोलावलं नसताना येऊन धडकतो, विचारलं नसताना खूप सांगत बसतो; त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी तो [बिनधास्त] विश्वासून राहतो, असा माणूस बेअक्कल क्षुद्र होय.

Tuesday, July 23, 2013

१०६९. एकमेवाक्षरं यस्तु गुरुः शिष्यं प्रबोधयेत् |

पृथिव्यां नास्ति तद्द्रव्यं यद्दत्वा चानृणी भवेत्‌ ||

अर्थ

गुरुनी शिष्याला जरी एखादंच अक्षर शिकवलं तरी; त्यांना एखादी वस्तु देऊन; त्या उपकाराची फेड करता येईल अशी कोणतीही वस्तु या जगात नाही.

१०६८. आस्ते भग आसीनस्योर्ध्वस्तिष्ठति तिष्ठत: |

शेते निपद्यमानस्य चराति चरतो भग: || ऐतरेय ब्राह्मण

अर्थ

बसून राहाणाऱ्याच नशीब बसूनच रहात; आपण उभं राहील तर ते उभं राहात; झोपल्यावर झोपून राहात आणि चाललं [आपण खटपट केली तर] चालतं. [पुढे सरकत - नशिबाला दोष देण्या ऐवजी आपण प्रयत्न केले पाहिजेत.]

Saturday, July 20, 2013

१०६७. रोग-शोक-परीताप-बन्धन-व्यसनानि च |

आत्मापराधवृक्षाणां फलान्येतानि देहिनाम् ||

अर्थ

माणसांनी आपणच केलेले अपराधरूपी जो वृक्ष असतो त्याची फळं म्हणजे - [आपणच केलेल्या चुकांचे परिणाम असतात खरं तर हे] आजारी पडणं; [आपण जास्त; पौष्टीक नसलेलं; वेळीअवेळी खाल्लं की आजारी पडतो] शोक-अति दुःख; मानसिक व्याधि; अडकणं; संकटे.

Tuesday, July 16, 2013

१०६६. धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोकं किमिति निजकलङ्कं नात्मसंस्थं प्रमार्ष्टि |

भवति विदितमेतत्प्रायशः सज्जनानां परहितनिरतानामादरो नात्मकार्ये ||

अर्थ

चन्द्र हा सर्व जगाला उजळवतो [अंधार नाहीसा करतो] मग स्वतःवरचा तो डाग [कलंक] का बरं धुवून टाकत नाही? हे सर्वांना ठाऊकच आहे की पुष्कळ वेळा दुसऱ्याला मदत करण्यात गढून गेलेल्या सज्जनांचे स्वतःच्या कामाकडे फारस लक्ष नसते. [त्यांचा सगळा जीव दुसऱ्याला मदत करण्याकडे असतो. आपण वाईट दिसतोय तर प्रसाधन करावं असं त्यांच्या लक्षात येत नाही.]