भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 28, 2010

१६८. द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |

१६८. द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता ||

अर्थ

सुभाषिताची माधुरी [पाहिल्यावर आपण त्याच्यापुढे काहीच नाही म्हणून ] द्राक्ष काळवंडली, साखरेचा दगड बनला, अमृत तर घाबरून स्वर्गात निघून गेलं.

१६७. साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |

१६७. साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ

ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

Thursday, May 27, 2010

१६६. लक्ष्मीवन्तो न जानन्ति प्रायेण परवेदनाम् |

१६६. लक्ष्मीवन्तो न जानन्ति प्रायेण परवेदनाम् |
शेषे धराभरक्रान्ते शेते नारायणः सुखम् ||

अर्थ

श्रीमंत लोकांना सहसा दुसऱ्याचं दुःख समजत नाहीत. [जसं] पृथ्वीच्या ओझ्याने थकलेल्या शेषावर नारायण खुशाल झोपून राहतो.

१६५. तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |

१६५. तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ||

अर्थ

गवतापेक्षाही कापूस हलका असतो, कापसापेक्षा याचक क्षुद्र असतो. [मग प्रश्न असा पडतो की] वाऱ्याने त्याला उडवले कसे नाही? तर माझ्याजवळ काहीतरी मागेल म्हणून.

१६४. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |

१६४. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||

अर्थ

सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे [चांगलं वाईट] ठरवतात.

मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या नाटकातील पहिल्या अंकातला हा श्लोक आहे.

१६३. दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि त्रृप्तौ न च चक्षुषी मे |

१६३. दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि त्रृप्तौ न च चक्षुषी मे |
तयोर्विवादं परिहर्तुकामः समागतोऽहं तव दर्शनाय ||

अर्थ

खूप लांबवरून आपली कीर्ति ऐकून कानांच समाधान झालं पण [ आपलं दर्शन लांबून होऊ शकत नसल्याने] डोळे मात्र अतृप्त राहिले. [म्हणून] त्याचं भांडण होऊ लागलं ते मिटवण्यासाठी मी [आपल्या दर्शनाने डोळ्यांना सुखी करण्यासाठी] आलो आहे.

१६२. स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |

१६२. स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ||

अर्थ

संकट कोसळलं म्हणून सज्जन स्वतःचा [सुस्वभाव] कधीहि सोडत नाही. कापाराला अग्नीचा स्पर्श झाला [जळून नाहीसा होण्याची वेळ आली तर उलट] तरी तो अधिकच सुगंधित होतो.