भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, September 6, 2013

१०९८. यस्मिन्देशे न संमानो न प्रीतिर्न च बान्धवाः |

न च विद्यागमः कश्चिन्न तत्र दिवसं वसेत् ||

अर्थ

ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळत नाही; आपल्याला तिथे राहून आनंद होत नाही; आप्तेष्ट तिथे नाहीत आणि [नवीन] काहीतरी शिकण्याची संधी पण नाही; अशा स्थळी एक दिवस सुद्धा राहू नये.

Thursday, September 5, 2013

१०९७. सुखमापतितं सेव्यं दु:खमापतितं तथा |

चक्रवत्परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च ||

अर्थ

ज्याप्रमाणे प्राप्त झालेले सुखं आपण [आनंदाने उप] भोगत असतो, त्याच प्रमाणे दुःखही भोगले [सोसले] पाहिजे. कारण सुखे आणि दुःखे चाकाप्रमाणे फिरत असतात. [जसं नेहमी सुख मिळत नाही, तसं सतत दुःखसुद्धा सोसावे लागत नाही. तर तक्रार न करता आनंदाने प्रारब्धाला तोंड दिलं पाहिजे.]

Wednesday, September 4, 2013

१०९६. स्तोकेनोन्नतिमायाति स्तोकेनायात्यधोगतिम् |

अहो सुसदृशी वृत्ति: तुलाकोटे: खलस्य च ||

अर्थ

अहो! तराजूची दांडी आणि दुष्टाचे वागणे किती सारखे आहे बरे! थोड्याशा [तागडीच्या बाबतीत वजनाने] कारणाने वर चढतो [संतुष्ट होतो; त्याला गर्व होतो] आणि अगदी थोड्याने खाली जातो. [जरा कमी फायदा वाटला तर दुष्ट खालच्या थराला जाऊन नुकसान करतो.]

Tuesday, September 3, 2013

१०९५. शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसम्पदा |

शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिः नमोऽस्तु ते ||

अर्थ

दीपज्योतीमुळे  [प्रकाशामुळे] आरोग्य; संपत्ती मिळते, ति हितकारक असते. [मनातील] वाईट बुद्धी तिच्यामुळे नाहीशी होते. [हे दीपज्योति] तुला नमस्कार असो.

Monday, September 2, 2013

१०९४. यस्य वर्णनं बुधा सदादरेण कुर्वते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते |

यो हिमेन दुर्गमेन कञ्चुकेन संवृतः
 उन्नतः सुतीक्ष्णशृङ्गशस्त्रजालकावृतः
भारतस्य रक्षणाय सज्ज एव वर्तते
भारतस्य भूषणं हिमालयो विराजते ||

अर्थ

विद्वान लोक ज्याचे वर्णन नेहमी आदराने करतात तो भारताचे भूषण असलेला हिमालय पर्वत नेहमी शोभून दिसतो. ज्यातून शिरणे अत्यंत कठीण, अशा बर्फ रूपी कवचाने झाकलेला [बर्फाचे चिलखत चढवलेला] ज्यात अति उंच आणि टोकदार अशी शिखरे सर्वत्र पसरली आहेत असा, हिमालय पर्वत भारताच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे.

१०९३. प्रथमदिवसचन्द्र: स च सकलकलाभि: पूर्णचन्द्रो न वन्द्य: |

अतिपरिचयदोषात्कस्य नो मानहानिर्नवनवगुणरागी प्रायशो जीवलोकः ||

अर्थ

पहिल्या दिवशी [शुद्ध प्रतिपदेला] उगवलेल्या चंद्राला सर्वजण वंदन करतात. सर्व कलांनी पूर्ण असलेल्या [पौर्णिमेच्या] चंद्राला नमस्कार करत नाहीत. अतिपरिचयाने कोणाची मानहानी होत नाही बरे? बहुतांशी मानवप्राणी नवनवीन गोष्टींवर प्रेम करतो.

१०९२. अन्तःसारैरकुटिलैरच्छिद्रैः सुपरिक्षितैः |

मन्त्रिभिर्धार्यते राज्यं सुस्तम्भैरिव मन्दिरम् ||

अर्थ

वजनदार; सरळ; भरीव [वाळवी वगैरे न लागलेल्या] नीट पारखून [चांगल्या जातीचे टिकाऊ लाकूड असलेल्या] खांबांनी मंदिर जसं भक्कम रहात तसच पोक्त; सुस्वभावी; चुगल्या ऐकून न घेणाऱ्या परिक्षेला पूर्ण उतरलेल्या  मंन्त्र्यांमुळे राज्याचे रक्षण होते.