भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 30, 2013

१०९१. एकेन तिष्ठताधस्तादन्येनोपरि तिष्ठता |

दातृयाचकयोर्भेद: कराभ्यामेव सूचित: ||

अर्थ

एकाचा [दात्याचा] हात वर असतो आणि दुसऱ्याचा [घेणाऱ्याचा] हात खाली असतो. या [उच्च स्थान आणि खालच स्थान] या दोन हातांच्या स्थानामुळे [दाता कोण आणि याचक कोण हे] दाता आणि याचक यांच्यातला फरक कळतो.

१०९०. मन्दं हसन्तं प्रभया लसन्तं जनस्य चित्तं सततं हरन्तम् |

वेणुं नितान्तं मधु वादयन्तं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||

अर्थ

मृदु हास्य करणाऱ्या; तेजाने झळकणाऱ्या सतत लोकांचे चित्त आकर्षित करणाऱ्या; अत्यंत गोड आवाजात बासरी वाजवणाऱ्या बाळकृष्णाचे मी मनापासून स्मरण करते.

Wednesday, August 28, 2013

१०८९. यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः |

ध्यानावास्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ||

अर्थ

अतिशय उत्कृष्ट अशा कवनांनी ब्रह्मदेव; वरुण; इंद्र; मरूतगण ज्याची स्तुती करतात; सामगायन करणारे ऋषि वेदाच्या ऋचांचे यथाविधी पठण करतात; त्याच्यावर लक्ष्य एकाग्र करून त्याच्याच स्वरूपात परिणत होऊन योगी ज्याचं दर्शन घेतात; देव किंवा राक्षस या पैकी कोणालाच ज्याच पूर्ण आकलन झालं नाही अशा परमेश्वराला मी वंदन करते.

Friday, August 23, 2013

१०८८. कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |

कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ||

अर्थ

मोठ्या प्रासादांचा शेवट अंतर्गत भांडणांमुळे, [खूप श्रीमंती असली तरी भाऊबंदकी मुळे सर्वांचे पैसे वकिलाकडे जाऊन ते वैभव रहात नाही.] मैत्रीचा शेवट वाईट बोलण्याने होतो, राष्ट्राचा अन्त वाईट राजामुळे होतो व अपकृत्यामुळे माणसाची कीर्ती लयाला जाते.

१०८७. प्राप्ते भये परित्राणं प्रीतिविश्रम्भभाजनम् |

केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् ||

अर्थ

भीतीदायक [परिस्थिती आली] असता मित्र हा रक्षणकर्ता; प्रेमाचा आणि विसाव्याचे स्थान असतो. मित्र हि दोन अक्षरे असलेले हे रत्न कोणी बरे निर्माण केले. [त्या देवाला धन्यवाद.]

१०८६. काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति |

सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धाः सर्वयत्नाः फलन्ति ||

अर्थ

लाकडे एकामेकावर घासल्यामुळे अग्नि उत्पन्न होतो. [खरं म्हणजे हे फार कठीण काम आहे पण प्रयत्नपूर्वक सतत करत राहिल्यास यश मिळत.] जमीन खणत राहिल्याने [खूप काळाने का होईना] पाणी लागत. उत्साही लोकांना अशक्य असे काही नाही. [योग्य रीतीने] प्रयत्न केल्यावर ते फलद्रूप होतातच.

१०८५. तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले |

यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा ||

अर्थ

[आज संस्कृत -दिन आहे २०/०८/२०१३] जोपर्यंत  आर्यांचा वंश या जगामध्ये अस्तित्वात आहे, तोपर्यंत देवांची असलेली ही नितांतसुंदर आणि सामर्थ्यवान अशी संस्कृत भाषा अढळ स्थानी राहील.