भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, June 28, 2013

१०५०. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् |

यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ||

अर्थ
 
ज्याच्या कृपेने मुक्याला बोलता येऊ लागत; पांगळा पर्वत चढतो, त्या अत्युच्च आनंदस्वरूप अशा रमापति विष्णूला मी प्रणाम करतो.

१०४९. कान्तं वक्ति कपोतिकाकुलतया नाथान्तकालोऽधुना व्याधोऽधो धृतचापसज्जितशरः श्येनः परिभ्राम्यति |


इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतः तूर्णं तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||

अर्थ

अगदी आर्तपणे कबुतराची मादी त्याला म्हणते; "स्वामी; आता आपलं संपल! [झाडाच्या] खाली पारधी धनुष्याला बाण जोडून सोडायला तयार झालायं. [म्हणून वर उडून जावं तर वर] ससाणा घिरट्या घालतोय"; पण असं घडलं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्यामुळे त्याचा नेम चुकून त्या बाणाने] ससाणा पण मेला [आणि] लगेच [कबुतरांच्या ऐवजी] ते दोघेच यमाच्या घरी गेले नशिबाची चाल वेगळीच असते. [अगदी अटळ वाटत असलेला मृत्यू सुद्धा चुकला. म्हणून माणसानी आशा सोडू नये.]

Wednesday, June 26, 2013

१०४८. न हि वैरेण वैराणि शाम्यन्तीह कदाचन |

अवैरेण हि शाम्यन्ति एष धर्मः सनातनः ||

अर्थ

शत्रुत्व कधीही अधिक वैर केल्यामुळे संपून जात नाहीत. हा पूर्वापार चालत आलेला धर्म आहे की प्रेम लावल्यानेच शत्रुत्व नाहीसे होते.

Monday, June 24, 2013

१०४७. हे हेमकार परदुःखंविचारमूढ किं मां मुहुः क्षिपसि वारशतानि वह्नौ |

संदीप्यते मयि सुवर्णगुणातिरेको लाभः परं तवमुखे खलु भस्मपातः ||

अर्थ

हे  दुसऱ्याला दुःख होतय याचा जराही विचार न करणाऱ्या सोनारा; मला शेकडो वेळा आगीत का रे फेकतोस? खरोखर त्यामुळे [माझ्यातील हीण जळून मी] सुवर्णाने झळकत आहे [माझा तर फायदाच होतोय] पण तुझ्या तोंडात मात्र राख उडतेय [या वाईट कामाचं वाईट फळ तुलाच भोगावं लागतंय] [सुवर्णान्योक्ती. सोन = सद्गुणी मनुष्य, सोनार = दोष दाखवणारे ]

१०४६. प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम् |

ददति जलमानल्पास्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ||

अर्थ

अगदी लहानपणी जे थोड पाणी लोकांनी पाजलेलं [नारळाच्या झाडाला पाणी दिलेलं] असत त्याच ओझ डोक्यावर घेऊन गोड असं भरपूर पाणी आयुष्यभर ते - नारळ देतात. सज्जनलोक केलेले उपकार कधीही विसरत नाहीत.

१०४५. आघ्रातं परिचुम्बितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितं त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा तत्र व्यथां मा कृथाः |

हे सद्रत्न तवैतदेव कुशलं  यद्वानरेणादरादन्तःसारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना ||
अर्थ

हे उत्कृष्ट प्रकारच्या रत्ना; [माकडाच्या हातात सापडल्यावर त्याने तुला] हुंगलं; चाटलं; बराचवेळ चोखलं त्यानंतर चावून पाहिलं किंवा [काय दगडच आहे असं म्हणून] तुच्छतेने जमिनीवर फेकून दिलं, तरी त्याबद्दल अजिबात दु:ख वाटून घेऊ नकोस. ह्यातच तुझ भलं आहे की याच्या गाभ्यात काय बरं आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेने त्यांनी दगडानी ठेचून भुगा केला नाही. [रत्नान्योक्ती - अतिशय गुणी व्यक्ती माकड - गाजरपारखी मालक असं झाल्यावर त्याला सन्मान मिळण कठीणच. निदान पुरी वाट लावली नाही हेच नशीब.]

Friday, June 21, 2013

१०४४. यस्य न ज्ञायते वीर्यं न कुलं न विचेष्टितम् |

न तेन सङ्गतिं कुर्यादित्युवाच बृहस्पतिः ||

अर्थ

[देवांचा गुरु] बृहस्पती म्हणतो की ज्याचा पराक्रम [केवढा आहे ते]; घराणं आणि हालचाली ठाऊक नाहीत त्याच्या सहवासात [मैत्री किंवा त्याला मदत किंवा त्याच्याकडून मदत घेण्यासाठी सुद्धा] राहू नये.