भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, May 7, 2013

१०००. मतिरेव बलाद्गरीयसी तदभावे करिणामियं दशा |

इति घोषयतीव डिण्डिमः करिणो हस्तिपकाहतः क्वणन् ||

अर्थ

"शारीरिक बळाहून बुद्धीच श्रेष्ठ आहे आणि ती नसल्यामुळेच हत्तींची  अशी दशा - अवस्था झालीय " अशी दवंडी पिटवण्यासाठीच जणू काही माहुताकडून वाजवल्या जाणाऱ्या नगाऱ्याचा ध्वनी होतो आहे.

९९९. अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं; सुरक्षितं दैवहतं विनश्यति |

जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः; कृतप्रयत्नोऽ पि गृहे न जीवति ||

अर्थ

दैवाच्या मनात असेल [त्या प्राण्याच नशीब जोरावर असेल तर] ते दैवच - त्याला कोणी संभाळणार नसलं तरी [ते] त्याचा सांभाळ करत. पण नशीब फिरलं असेल तर त्याला कितीही बंदोबस्तात ठेवलं तरी त्याचा नाश होतो. रानावनात सोडून दिलेले निराधार मूल दीर्घायुषी होईल पण दैव सहायक नसेल तर घरात सुद्धा हर प्रयत्न करूनही ते जगत नाही.

९९८. गुणिनि गुणज्ञो रमते; नागुणशीलस्य गुणिनि परितोष: |

अलिरेति वनात्पद्मं; न दर्दुरस्त्वेकवासोऽपि ||

अर्थ = [स्वतः] गुणी माणसालाच गुणवंतांच प्रेम - कौतुक असत, ज्याला स्वतःला त्यात गति नसेल तर त्याला गुणवंताचा आदर - प्रेम काही वाटत नाही. भुंगा [अगदी दुरून] अरण्यातून [सरोवराकडे] येतो पण त्याच जलाशयात रहात असूनही बेडूक कमळाच्या [जवळपास] फिरकत नाही.

९९७. न यत्रास्ति गतिर्वायोः रश्मीणाञ्च विवस्वतः |

तत्रापि प्रविशत्याशु बुद्धिर्बुद्धिमतां सदा ||

अर्थ

जिथे वारासुद्धा शिरू शकणार नाही किंवा जिथे सूर्यकिरणांनाही जाता येत नाही, तेथे सुद्धा बुद्धिमान लोकांची बुद्धी अगदी नेहमी झटकन जाऊन पोहोचते.

९९६. अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिस्तथा |

द्वावेतौ सुखमेधेते यद्भविष्यो विनश्यति ||

अर्थ

संकटाची चाहूल ओळखून आधीच त्यावरील उपायासंबंधी विचार आणि योजना करून ठेवणारा; संकट आल्यावर लगेचच चाणाक्षपणे त्यावर बुद्धीने मत करणारा, हे  दोघेच जीवनात  सुखी होतात. दैवात जसे असेल तसे होईल असे म्हणून काहीही न करता निष्क्रीय राहणारा [संकटांनी] नाश पावतो.

९९५. मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा |

ग्रामणिर्गणकश्चैव सप्तैते परभक्षकाः ||

अर्थ

माशी; डास; वेश्या; भिकारी; तसंच गावाचा मुख्य आणि कारकून हे सातजण दुसऱ्याच खाऊन जगतात. [त्यांची स्वकष्टाची मिळकत फारच कमी असते.]

९९४. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा ; कालो जगद्भक्षकः |

लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला ; विद्युच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद ; त्वं रक्ष रक्षाधुना ||

अर्थ

आपल्या डोळ्यादेखत आयुष्याचा ऱ्हास होतोय; तारुण्य हळूहळू संपतय; [एकदा] गेलेले दिवस पुन्हा परत येत नाहीत; काळ तर जगाला खाऊन टाकतोच आहे; संपत्ती पाण्यावर उठून क्षणात फुटणाऱ्या लाटेसारखी चंचल आहे, आयुष्य विजेसारखं क्षणिक आहे; तरी [सगळ्यांना] आसरा देणाऱ्या परमेश्वरा; तूच माझा सांभाळ कर; मी तुला शरण आलो आहे.