भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, April 30, 2010

११८. मनो यस्य वशे तस्य भवेत्सर्वं जगद्वशे |

११८. मनो यस्य वशे तस्य भवेत्सर्वं जगद्वशे |
मनसस्तु वशे योऽस्ति स सर्वजगतो वशे ||

अर्थ

ज्याच्या मन ताब्यात असेल, त्याच्या ताब्यात सर्व जग आहे. पण जो मनाच्या ताब्यात आहे, [ज्याचा मनावर संयम नाही] त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते.

११७. सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |

११७. सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ||

अर्थ

ह्या [जगामध्ये] सर्वजण सुखी राहोत. सर्वजण निरोगी असोत. सर्वांचे खूप कल्याण होवो. कोणालाही दुःख भोगायला लागू नये.

Thursday, April 29, 2010

११६. सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम् |

११६. सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम् |
वृणुते हि विम्रृश्यकारिणं गुणलुब्धः स्वयमेव सम्पदः ||

अर्थ

[कोणतेही] काम एकदम [विचार न करता] करू नये. अविचार हा मोठ्या संकटाचे स्थान असतो. लक्ष्मी [शब्दशः सम्पत्ती] स्वतः विचार करून काम करणाऱ्याला वरते.

हा भारवीचा श्लोक आहे.

११५. सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः ।

११५. सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः ।
अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ॥

अर्थ

विनाश जवळ आल्यावर बुद्धिमान अर्ध्याचा त्याग करतात (अर्ध्यागोष्टी सोडून देतात) आणि (राहिलेल्या) अर्ध्यामधे काम भागवतात, त्यामूळे सर्वनाश होत नाही.

११४. न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति ।

११४. न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति ।
अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥

अर्थ

कोणाचे कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून हुशार माणसाने कामे लगेच करावी (उगाच कर्तव्यात चालढकल करू नये)

११३. नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले ।

११३. नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले ।
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥

अर्थ

मी वाकी ओळखत नाही (आणि) मी कर्णफुले ओळखत नाही. पण नेहमी पायांना नमस्कार करत असल्यामूळे मी पैंजण मात्र ओळखतो.

टीप:-
जेव्हा रावणाने पळवलेल्या सीतेचे दागिने राम आणि लक्ष्मणाला मिळतात त्यावेळी लक्ष्मणाचे हे उद्गार आहेत.

Wednesday, April 28, 2010

११२. नपूंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः |

११२. नपूंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः |
तत्तु तत्रैव रमते हताः पाणिनिना वयम् ||

अर्थ

मन हा [शब्द] नपुंसकलिंगी आहे असे जाणून आम्ही [बिनधास्त] त्याला प्रियेकडे धाडून दिले तर ते तिथेच रमून गेले. [खरं तर] पाणिनीनेच आमचा घात केला.

१११. काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुग्धाः निबध्नन्ति किमत्र चित्रम् |

१११. काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुग्धाः निबध्नन्ति किमत्र चित्रम् |
विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||

अर्थ

अडाणी लोक काचेचा [मणी] सोनं आणि रत्न अशा भारी आणि अगदी क्षुल्लक वस्तू एकाच सूत्रात [दोऱ्यात]  गुंफतात यात नवल ते काय? ज्ञानी अशा पाणिनीने देखील श्वान [कुत्रं] युवा [तरुण] मघवा [इन्द्र] एकाच सूत्रात [सूत्राची व्याख्या श्लोक क्रमांक १०७]  माळेत ओवले. [श्वायुवामघवा असं एक सूत्र आहे]

११०. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।

११०. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे ह्यात्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥

अर्थ

कुटुंबाच्या भल्यासाठी एकाचा त्याग करावा (बळी द्यावा), गावासाठी एका घराचा त्याग करावा, शहरासाठी गावाचा त्याग करावा तर स्वतःसाठी पृथ्वीचा त्याग करावा.

१०९. अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च ।

१०९. अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च ।
वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत् ॥

अर्थ

पैशाचा ह्रास, मनाला झालेला त्रास आणि घरी घडलेल्या वाईट गोष्टी आणि फसवणूक आणि अपमान - ह्या गोष्टी शहाण्या माणसाने उघड करू नयेत

१०८. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् ।

१०८. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानम् समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपि च ॥

अर्थ
समुद्रामधे झालेला पाऊस व्यर्थ, भूक नसलेल्याला जेवण देणे व्यर्थ. श्रीमंताला दिलेले दान व्यर्थ आणि दिवसा लावलेला दिवा पण व्यर्थ.

१०७. अल्पाक्षरमसन्दिग्धं सारवद्विश्ववतोमुखम् |

१०७. अल्पाक्षरमसन्दिग्धं सारवद्विश्ववतोमुखम् |
अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः ||

अर्थ

कमीत कमी अक्षरात लिहिलेले, अर्थ अगदी स्पष्ट असणारे, [कुठला तरी] मुद्दा मांडणारे, सर्व उदाहरणात वापरता येते असे निर्दोष [वाक्य] म्हणजे सूत्र असे ज्ञानी लोक म्हणतात

१०६. येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः |

१०६. येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः |
तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः ||

अर्थ

माणसांची वाणी विपुल अशा [बिनचूक] शब्द रूपी स्वच्छ उदकाने शुद्ध केली अज्ञानाचा अंधार नाहीसा केला त्या [ थोर महर्षी] पाणिनींना नमस्कार असो

Tuesday, April 27, 2010

१०५. उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात् परं बलम् ।

१०५. उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात् परं बलम् ।
सोत्साहस्य हि लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ॥

अर्थ

हे भल्यामाणसा, उत्साह दाखव (आणि सज्ज हो). उत्साहापेक्षा श्रेष्ठ बळ नाही. ह्या जगात उत्साही माणसाला काहीच अशक्य नाही.

टीप :-
जेव्हा सीतेला रावण पळवून नेतो त्यावेळी हताश झालेल्या रामाला उद्देशून लक्ष्मण वरील श्लोक म्हणतो.

१०४. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा ।

१०४. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा ।
संपत्तौ च विपत्तौ च महतामेकरुपता ॥

अर्थ

सूर्य उगवतांना तसेच मावळतांना लाल असतो, त्याप्रमाणे थोर माणसे चांगल्या तसेच कठीण प्रसंगी सारखीच असतात (वागतात).

Monday, April 26, 2010

१०३. रामाभिषेके जलमाहरन्त्याः हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याः |

१०३. रामाभिषेके जलमाहरन्त्याः हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याः |
सोपानमार्गेण करोति शब्दं ठ ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ ||

अर्थ

रामराज्याभिषेकासाठी पाणी आणतांना सोन्याची घागर तरुणीच्या हातातून सुटून जिन्यावरून ठ ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ असा आवाज करत खाली येते.

१०२. असितगिरिसमं स्यात्‌ कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमूर्वी |

१०२. असितगिरिसमं स्यात्‌ कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमूर्वी |
लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति ||

अर्थ

पर्वताएवढे काजळ हीच शाई, समुद्ररुपी भांडेकरून, कागद म्हणून पृथ्वीवर जर सरस्वतीने कल्पवृक्ष्याच्या फांदीच्या लेखणीने सतत लिहीले तरी हे परमेश्वरा तुझ्या गुणांचा अंत येणार नाही.

१०१. अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे|

१०१. अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे|
इति मे मे कुर्वाणं कालवृकॉ हन्ति पुरुषाजम् ||

अर्थ

[हे] अन्न मे, [अस्मद सर्वनाम षष्टी एकवचन अर्थ माझे] कपडे मे, [माझे] पत्नी मे,[माझी] हे नातेवाईक मे, [माझे] असे मे मे करणाऱ्या मनुष्य रूपी बोकडाला काळ रूपी लांडगा ठार मारतो.

१००. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः |

१००. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः |
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||

अर्थ

सर्व उपनिषदातील [तत्त्वज्ञान]ह्याचा अर्थ गाई, श्रीकृष्ण हा दूध काढणारा, अर्जुन म्हणजे वासरू, जाणकार ह्याला [ते सारभूत तत्वज्ञान रूपी] अमृतासारखे श्रेष्ठ असे दूध म्हणजे गीतांमृत चाखायला मिळते.

Saturday, April 24, 2010

९९. यदीच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा|

९९. यदीच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा|
परापवादसस्येषु चरन्तीं गां निवारय ||

अर्थ

जर एकाच कृत्याने जग ताब्यात आणण्याची [तू] इच्छा करत असशील, तर दुसऱ्याचे दोष रूपी धान्यावर चरत असलेल्या [आपल्या] वाणिरूपी गाईला अडव. [दुसऱ्यांची   निंदा करून आपण शत्रू करून घेत असतो. ]

९८. सद्विद्या यदि का चिन्ता वराकोदरपूरणे |

९८. सद्विद्या यदि का  चिन्ता  वराकोदरपूरणे |
शुकोऽप्यशनमाप्नोति राम रामेति च ब्रुवन् ||

जर चांगलं शिक्षण झालं असलं तर, क्षुल्लक पोट भरण्याची, काय काळजी? [केवळ] राम राम असे बोलण्याने पोपटसुद्धा पोट भरतो.

Friday, April 23, 2010

९७. सम्पुर्णकुम्भो न करोति शब्दम् अर्धो घटो घोषमुपैति नूनम्।

९७. सम्पुर्णकुम्भो न करोति शब्दम् अर्धो घटो घोषमुपैति नूनम् ।
विद्वान कुलीनो न करोति गर्वम् जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहीनाः ।।

अर्थ

पाण्याने पूर्ण भरलेल्या घागरीचा (घागरीतील पाण्याचा) आवाज येत नाही, अर्धवट भरलेल्या घागरीचा मात्र येतो. त्याचप्रमाणे विद्वान, चांगली माणसे गर्व करत नाही, अडाणी मूर्खमात्र उगाच बडबड करतात.

९६. अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।

९६. अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।
अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥

अर्थ

अन्नदान श्रेष्ठ आहे, पण विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नामूळे त्यावेळेची भूक भागते मात्र विद्येमूळे संपूर्ण आयुष्याची.

९५. काचः काञ्चनसम्पर्कात् धत्ते मारकतिं द्युतिम् ।

९५. काचः काञ्चनसम्पर्कात् धत्ते मारकतिं द्युतिम् ।
तथा सत्सन्निधानेन मूर्खोयाति प्रवीणताम् ॥

अर्थ

काचसुद्धा सोन्याच्या संपर्कात येऊन चमकते. त्याप्रमाणे चांगल्या लोकांच्या सहवासामूळे मूर्खसुद्धा तरबेज होतात.

९४. पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम्।

९४. पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम्।
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम् ||

दुसर्‍याला  दिलेले पैसे आणि [घरात असलेल्या, डोक्यात न पोहोचलेल्या] विद्येचा  जरूरीच्या  वेळी काही उपयोग होत नाही.

९३. गते शोको न कर्तव्यो भविष्यम नैव चिन्तयेत्‌।

९३. गते शोको न कर्तव्यो भविष्यम नैव चिन्तयेत्‌।
वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते॥

जे [झाले] गेले, त्याच्याविषयी दु:ख  करू नये. पुढे होणार्‍या गोष्टींचा विचार [काळजी] मुळीच करू नये. शहाणा माणूस या जगात चालू काळाला अनुसरून वागत असतो.

सहभाग : यशश्री साधू

९२. आलस्येन गतं दीर्घ जीवितं न हि जीवितम्‌।

९२. आलस्येन गतं दीर्घ जीवितं न हि जीवितम्‌।
क्षणमेकं सुयत्नेन यो जीवति स जीवति ॥

आळशीपणाने गेलेले आयुष्य दीर्घ [लांब] असले [तरी] हे खरे [सफल] आयुष्य नव्हे. एक क्षण [का होईना, पण] चांगला प्रयत्न करून जो जगतो तोच [खरा] जगतो.

सहभाग : यशश्री साधू

Thursday, April 22, 2010

९१. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: ।

९१. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: ।
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ॥

अर्थ

रात्र जाऊन सकाळ होईल, सूर्य उगवेल आणि कमळ उमलेल. (आणि तेव्हा मला बाहेर पडता येईल) अशी स्वप्न कमळाच्या कोशात अडकलेला भुंगा बघतो. पण हाय रे देवा, हत्तींनी त्या कमळालाच पायदळी तुडवलं. (आणि त्याचबरोबर भुंग्याच स्वप्नदेखील.)

सहभाग : यशश्री साधू

९०. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः ।

९०. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः ।
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे ॥

अर्थ

प्रत्येक देहाची बुद्धी वेगळी, प्रत्येक कुण्डामधे वेगळे पाणी, प्रत्येक जातीमधे नवीन (वेगळे) आचार तर प्रत्येकाच्या मुखी वेगळी वाणी (बोली).

८९. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः ।

८९. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः ।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत् ॥

अर्थ

अतिदान केल्यामुळे बळी बांधला गेला, तर अ्ती अहंकारामुळे दुर्योधन. अति लोभापायी रावणाचा नाश झाला. त्यामुळे सर्व ठिकाणी "अती" चा त्याग करावा. (अती तेथे माती).

८८. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते|

८८. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते|
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ||

अर्थ

हे लक्ष्मणा, लंका सोन्याने जरी मढलेली असली, तरी देखील ती मला रुचत नाही. [कारण] माता आणि (मातेसमान असणारी) जन्मभूमी हि मला स्वर्गाहूनही प्रिय आहे.

सहभाग : यशश्री साधू

Wednesday, April 21, 2010

८७. अव्याकरणमधीतं भिन्नद्रोण्या तरङगिणीतरणम् |

८७. अव्याकरणमधीतं भिन्नद्रोण्या तरङगिणीतरणम् |
भेषजमपथ्यसहितं त्रयमिदं कृतं वरं न कृतम् ||

अर्थ

व्याकरणाशिवाय [भाषा] शिकणे, फुटक्या होडीतून नदी पार करणे, औषध घेत असताना पथ्य न करणे या तीन गोष्टी करण्यापेक्षा न करणे बरे.

Tuesday, April 20, 2010

८६. पादं गुरुभ्यो आदत्ते पादं शिष्य: स्वमेधया |

८६. पादं गुरुभ्यो आदत्ते पादं शिष्य: स्वमेधया |
पादं सब्रह्मचारिभ्य: पाद: कालेन पच्यते ||

अर्थ

शिष्य एक चतुर्थांश [ज्ञान] गुरूकडून घेतो. एक चतुर्थांश स्वत:च्या अकलेने [समजून] घेतो. एक चतुर्थांश सहाध्यायींबरोबर [त्याला] कळतात. [आणि ] पाव गोष्टी [काही]काळाने मुरतात.

८५. उदारस्य तृणं वित्तम् शूरस्य मरणं तृणम् |

८५. उदारस्य तृणं वित्तम् शूरस्य मरणं तृणम् ।
विरक्तस्य तृणं भार्या निस्प्रृहस्य तृणं जगत् ।।

अर्थ

उदार माणसाला पैसे क्षुल्लक, वीरासाठी मरण क्षुल्लक, विरक्तासाठी बायको क्षुल्लक तर कशाची इच्छा नसलेल्यासाठी हे जग क्षुल्लक.

८४. यस्तु संचरते देशान् सेवते यस्तु पंडितान् ।

८४. यस्तु संचरते देशान् सेवते यस्तु पंडितान् ।
तस्य विस्तारिता बुद्धिः तैलबिंदुरिवाम्भसि ॥

अर्थ

जे वेगवेगळ्या देशात (ठिकाणी) फिरतात, जे विद्वानांची सेवा करतात त्यांची बुद्धी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे (सगळीकडे) पसरते.

८३. कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्|

८३.  कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्|
बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥

[लग्नामधे] मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे, तर वडील त्याच्या गुणांकडे पहातात. नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष ठेवतात.

Monday, April 19, 2010

८२. कुसुमं वर्णसंपन्नं गन्धहीनं न शोभते |

८२. कुसुमं वर्णसंपन्नं गन्धहीनं न शोभते |
न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ||

अर्थ

सुगंध नसणारे फूल सुंदर रंगाचे असले तरी शोभून दिसत नाही. त्याचप्रमाणे काम न करता [मदत न करता फक्त] गोड बोलणे शोभून दिसत नाही.

८१. अधीष्व पुत्रकाधीष्व दास्यामि तव मोदकान् |

८१. अधीष्व पुत्रकाधीष्व दास्यामि तव मोदकान् |
अथान्यस्मै प्रदास्यामि कर्णावुत्पाटयामि ते ||

अर्थ

बाळा, अभ्यास कर रे. मी तुला [खूप] लाडू देईन. [न केलास तर] दुसऱ्या [मुलाला] देईन. [बरं का] आणि [तरी नाही केलास तर] तुझे कान पिळवटीन.

राजनीतीमधील साम-दाम-भेद-दंड या उपायांचे हे उदाहरण आहे.

८०. दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकि गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् |

८०. दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकि गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् |
विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोषि ||

अर्थ

हे दारिद्र्या, तू फार विचारी आहेस नेहमी खूप गुणी अशा माणसावर प्रेम करतोस. [त्यांच्याकडे राहून त्यांना गरीब करतोस]पण शिक्षण नसलेल्या किंवा [कोणतेही] गुण नसलेल्या [माणसांवर] क्षणभर सुद्धा प्रेम करीत नाहीस.

७९.प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति प्राणिन:|

७९.प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति प्राणिन:|
तस्मात तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता ||

अर्थ

गोड बोलण्याने सर्व माणसांना आनंद होतो. म्हणून तसेच बोलावे. बोलण्यात कंजूषपणा [शब्दशः गरिबी]कशाला?

Saturday, April 17, 2010

७८. वितरति गुरु: प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे

७८. वितरति गुरु: प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे न तु तयोः ज्ञाने वृत्तिं करोत्यपहन्ति वा |
भवति च पुन: भूयान् भेद: फलं प्रति तद् यथा प्रभवति शुचि: बिम्बग्राहे मणिः न् मृदां चय: ||

अर्थ

गुरु ज्ञानी [हुशार] विद्यार्थ्याला जसं ज्ञान देतो तसंच, मंद [मुलाला] पण देतो. त्यात एकाला अधिक किंवा कमी करीत नाही.  पण फळाच्या बाबतीत फार फरक पडतो. जसं प्रतिबिम्ब ग्रहण करण्याच्या बाबतीत तेजस्वी हिरा समर्थ असतो, मातीचे ढेकूळ नव्हे.

हा श्लोक भवभूतीच्या उत्तररामचरितातला आहे.

७७. लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा: धन्वन्तरिश्चन्द्रमा:

७७. लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा: धन्वन्तरिश्चन्द्रमा: गाव: कामदुभ: सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङना: |
अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शङखोऽमृतं चाम्बुधे: रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङगलम् ||

अर्थ

लक्ष्मी [धनाची देवता], कौस्तुभ, प्राजक्त, दारू, धन्वन्तरी [देवांचा वैद्य ], चंद्र, कामधेनु, ऐरावत [इन्द्राचा हत्ती], उर्वशी वगैरे अप्सरा, सात तोंडे असलेला [सूर्याचा] घोडा, विष, विष्णूचे धनुष्य, शङख आणि अमृत, अशी समुद्रातून निघालेली हि चौदा रत्ने तुमचे नेहमी कल्याण करोत.

७६. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|

७६. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम:||

अर्थ

ज्याप्रमाणे एखाद लाकूड आणि दुसर लाकूड महासागरात जवळ येतात. जवळ आल्यावर [काही वेळाने] दूर जातात.  [ते लाटा, भरती, ओहोटी वगैरे गोष्टींवर अवलंबून  असते] त्याप्रमाणे प्राण्यांचा सहवास असतो.  हा श्लोक महाभारतातील आहे.

Friday, April 16, 2010

७५. वनेऽपि सिंहाः मृगमांसभक्षा बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति ।

७५. वनेऽपि सिंहाः मृगमांसभक्षा बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति ।
एवं कुलीनाः व्यसनाभिभूता न नीतिमार्गं परिलंघयन्ति ॥

अर्थ

अरण्यात प्राण्यांचे मांस खाणारे सिंह, भुकेले असले तरी गवत खात नाहीत. त्याप्रमाणे, घरंदाज (सज्जन) कितीही संकटात असले तरी योग्य (न्याय्य) मार्ग सोडत नाही.

७४. सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् ।

७४. सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् ।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥

अर्थ
दास असो वा दासीपुत्र, जो कोणी मी असू दे. कोणत्या कुळात जन्माला यायचे ते नशीबावर अवलंबून असते, पराक्रम मात्र स्वतःवर.

Thursday, April 15, 2010

७३. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |

७३. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

अर्थ

ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी [शेवटी ] समुद्राला मिळते, त्याप्रमाणे [कुठल्याही] देवाला केलेला नमस्कार विष्णूलाच पोचतो.

७२. लज्जास्पदं न दारिद्र्यं पुरुषस्य कदाचन |

७२. लज्जास्पदं न दारिद्र्यं पुरुषस्य कदाचन |
दरिद्रोऽस्मीति जिह्रेति यत्त्वसौ तद् ह्रिय: पदम् ||

अर्थ

माणसाला कधीही गरीब आहे हि गोष्ट लज्जास्पद नाही. [मी ] गरीब आहे म्हणून तो लाजतो हे लज्जास्पद आहे.

७१. नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति ।

७१. नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति ।
स एव प्रच्युत स्थानात् शुनापि परिभूयते ॥

अर्थ
मगर स्वतःच्या ठिकाणी (पाण्यात) राहून हत्तीला सुद्धा ओढून घेते. त्याने स्वतःची जागा सोडल्यास (पाण्यातून बाहेर आल्यास) मात्र कुत्रासुद्धा त्याला हरवतो.

७०. स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा नखा नराः ।

७०. स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा नखा नराः ।
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ॥

अर्थ
दात, केस, नखे आणि माणसे त्यांच्या (योग्य) जागेवरुन हलल्यास (पडल्यास) त्यांची शोभा जाते. हे जाणून विद्वान माणसाने आपली जागा सोडू नये.

Wednesday, April 14, 2010

६९ बहूनामप्यसाराणां समावायो हि दुर्जय: |

६९ बहूनामप्यसाराणां समावायो हि दुर्जय: |
तृणैर्निमीयते रज्जु: येन नागोऽपि बध्यते ||

अर्थ
 
जरी अगदी क्षुल्लक वस्तू असल्या तरी त्यांचा गठ्ठा असल्यास तो जिंकणे फार कठीण असते. अगदी [साध्या] गवतापासून बनवलेल्या दोरीने [अतिविशाल] असा हत्ती सुद्धा बांधला जातो.

६८. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः ।

६८. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः ।
अन्ये च बदरीकाकारा बहिरेव मनोहराः ॥

अर्थ

सज्जन माणसे नारळासारखी असतात (बाहेरुन कठीण पण आतुन मृदु). पण दुसरे (दुर्जन) मात्र, बोरासारखे फक्त बाहेरुन सुंदर असतात. (आणि आतुन मात्र किडके)

६७. स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा ।

६७. स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा ।
सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम् ॥

अर्थ

उपदेश करुन स्वभाव बदलता येत नाही. जसे, पाणी चांगले तापवले तरी नंतर गारच होते.

६६. दुर्जनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् ।

६६. दुर्जनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् ।
उष्णो दहति चाङ्गारः शीतः कृष्णायते करम् ॥

अर्थ

दुर्जन माणसाबरोबर मैत्री किंवा प्रेम करु नये. जसे, कोळसा गरम असतांना चटका देतो आणि गार झाल्यावर हात काळा करतो. [दुष्टांशी कसाही सबंध आला तरी त्रासच होतो]

६५. तातेन लिखितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया |

६५. तातेन लिखितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया |
न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लङघिता ||

अर्थ

वडिलांनी लिहिले 'बाळ, माझी आज्ञा आहे म्हणून पत्र लिही’. नम्र अशा त्याने पत्र लिहिले आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही.

हा प्रहेलिका प्रकारचा श्लोक आहे. त्याने पत्र लिहिले नाही. वडिलांची आज्ञा मोडली नाही.  नतेन एकत्र घेतला की नम्र अशा त्याने पत्र लिहिले असा अर्थ होतो.

Tuesday, April 13, 2010

६४. छिन्नोऽपि रोहति तरुश्चन्द्र: क्षीणोऽपि वर्धते लोके |

६४. छिन्नोऽपि रोहति तरुश्चन्द्र: क्षीणोऽपि वर्धते लोके |
इति  विम्रृशन्त: सन्त: संतप्यन्ते  न ते विपदा ||

अर्थ

या जगामध्ये झाड तोडले तरी पुन्हा  वाढते. दुर्बल झालेला चंद्र सुद्धा [पूर्ण ] होतो.  असा विचार करून सज्जन लोक संकटाने खचून जात नाहीत.

६३. सर्प: क्रूर: खल: क्रूर: सर्पात् क्रूरतर: खल: |

६३. सर्प: क्रूर: खल: क्रूर: सर्पात् क्रूरतर: खल: |
सर्प: शाम्यति मन्त्रेण; न शाम्यति खल: कदा ||

अर्थ

साप हा क्रूर असतो. दुष्ट मनुष्य हा पण क्रूर असतो.  [पण] दुष्ट हा सापापेक्षा क्रूर असतो. [ अस म्हणायचं कारण ] सापाचं [विष ] शान्त करता येतं.  [औषधांनी दुष्परिणाम घालवता येतात ] पण दुष्ट कधी शान्त बसत नाही. [त्रास देतच  राहतो]

६२. कर्णामृतं सूक्तिरसं विमुच्य दोषेषु यत्न : सुमहान्खलस्य |

६२. कर्णामृतं सूक्तिरसं विमुच्य दोषेषु यत्न: सुमहान्खलस्य |
अवेक्षते केलिवनं प्रविष्ट: क्रमेलक: कण्टकजालमेव ||

अर्थ

कानांना सुख देणारा चांगल्या बोलण्याचा [सुंदर] अर्थ सोडून त्यातले दोष शोधण्याचाच दुष्ट मनुष्य प्रयत्न करतो. केळ्याच्या मोठ्या बागेत शिरलेला उंट [गोड केळी खायची सोडून] काट्यांचा पुंजकाच शोधतो.

६१. दानं भोगो नाश : तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य |

६१. दानं भोगो नाश : तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य |
यो न ददाति न भुङक्ते तस्य तृतीया गतिर्भवति ||

अर्थ

पैशाला दान [करणे ] उपभोग [घेणे ] आणि नष्ट होणे अशा तीन वाटा असतात. जो दान करीत नाही आणि उपभोगही घेत नाही त्याचे धन नाश पावते.

६०. या पाणिग्रहलालिता सुसरला तन्वी सुवंशोद्भवा

६०. या पाणिग्रहलालिता सुसरला तन्वी सुवंशोद्भवा
गौरी स्पर्शसुखावहा गुणवती नित्यं मनोहारिणी ।
सा केनापि हृता तया विरहितो गन्तुम् न शक्नोम्यहम्
रे भिक्षो तव कामिनी न हि न हि प्राणप्रिया यष्टिका ॥

अर्थ

(भिक्षू म्हणतो) जिचे लग्नानंतर लाड केले आहेत, जी सरळ स्वभावाची, सडपातळ, चांगल्या घरातील, गोरी, स्पर्श सुखकारक आहे, गुणवान, जी नेहमी मन हिरावून घेते, अश्या तिला कोणीतरी पळवले आहे. तिच्याशिवाय मी कोठे जाऊ शकत नाही. (हे ऐकणारा विचारतो) अरे भिक्षू, तुझी बायको का? (भिक्षू म्हणतो) नाही नाही, माझी प्राणाहून प्रिय काठी.

टीप :-
हा छेकापन्हुती अलङकार होतो त्यात द्व्यर्थी शब्दयोजना करून उत्सुकता कवी ताणतो आणि नर्म विनोद असतो. सुभाषिताच्या पहिल्या दोन चरणांमध्ये दिलेली विशेषणे स्त्री आणि काठीला दोघींना लागू होतात. काठीसाठी - जिचे हातात घेऊन लाड केले आहे, सरळ आहे (वेडीवाकडी नाही), बारीक आहे, चांगल्या बांबूपासून बनवलेली आहे, पांढरी, गुळगुळीत, जिला दोरा लावला आहे आणि नेहमी जिचे आकर्षण वाटते अशी.

Monday, April 12, 2010

५९. उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।

५९. उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः ॥

अर्थ

काम केल्यामुळेच कार्य पूर्ण होते फक्त स्वप्न बघून नाही. (जसे) झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून जात नाही.

५८. अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ।

५८. अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ।
परोपकरः पुण्याय पापाय परपीडनम् ॥

अर्थ

अठरा पुराणांमध्ये व्यासांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. दुसर्‍यावर उपकार करणे हे पुण्य तर दुसर्‍याल्या त्रास देणे हे पाप आहे.

Sunday, April 11, 2010

५७. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् |

५७. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् |
व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा ||

अर्थ

बुद्धिमान लोकांचा वेळ काव्याचा [आस्वाद घेण्यात] शास्त्राच्या [चर्चेत] आणि करमणूकी मध्ये जातो. मूर्ख लोकांचा वेळ मात्र व्यसन [करणे] झोप [कंटाळा करत ] आणि भांडणात जातो.

Saturday, April 10, 2010

५६. दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम्।

५६. दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम्।

आवृणुध्वमतो दोषान् विवृणध्वं गुणान् बुधा : ॥

अर्थ

हे बुद्धीमान लोकांनो, या जगात कुठलीही गोष्ट दोषरहित किंवा काहीच गुण नाही अशी नसते. [प्रत्येकामध्ये थोडे गुण आणि थोडे दोष असतातच. कुठलीच गोष्ट निर्दोष नसते ] म्हणून दोष झाका [त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ] आणि गुणांचा विस्तार करा. [त्या माणसाचे गुण वाढतील असे बघा. ]

Friday, April 9, 2010

५५. हारम् वक्षसि केनापि दत्तमज्ञेन मर्कट: |

५५. हारम् वक्षसि केनापि दत्तमज्ञेन मर्कट: |
लेढि जिघ्रति संक्षिप्य करोत्युन्नतमासनम् ||

अर्थ

कोणीतरी मूर्ख माणसाने माकडाला [रत्न] हार दिल्यावर [माकडाने] चाटला, वास घेतला आणि गुंडाळून [बैठक] उंच केली. [माकडाला रत्नांची किंमत काय कळणार?] त्याचप्रमाणे मूर्ख माणसाच्या ताब्यात फार चांगली गोष्ट मिळाली तर तो तिची किंमत ठेवत नाही.

५४. सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।

५४. सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयात् एषः धर्मो सनातनः ॥

अर्थ
खरे बोलावे, गोड बोलावे. खरे पण कटू बोलू नये. गोड परंतु खोटे बोलू नये असा फार पूर्वीपासून चालत आलेला धर्म आहे.

५३. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् ।

५३. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् ।
लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति ॥

अर्थ
ज्याला स्वत: ची बुद्धी नाही त्याला शास्त्र काय बरे [मदत] करणार. जसे आंधळ्याला आरशाचा काय बरे उपयोग ?

Thursday, April 8, 2010

५२. विदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मतिः ।

५२. विदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मतिः ।
परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वै गुणः ॥

अर्थ

परक्या ठिकाणी विद्या हेच धन असते (अनोळखी माणसे एखाद्याकडील विद्येमुळे त्याला सन्मान देतात). संकटात बुद्धी उपयोगी पडते. मृत्युपश्चात (जिवंतपणी केलेले) धर्माचरण उपयोगी येते तर शील (चांगली वागणूक) सगळीकडेच उपयोगी येते.

५१. हंस श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।

५१. हंस श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।
नीरक्षीरविवेकेतु हंसो हंसो बको बकः ॥

अर्थ

हंस पांढरा, बगळा पण पांढरा. हंस आणि बगळ्यात फरक काय? दूधातुन पाणी वेगळे करण्यात मात्र हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. (अशी एक समजुत आहे की हंस, दूध आणि पाण्याच्या मिश्रणातुन पाणी वेगळे करुन फक्त दूध पितो).

५०. काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।

५०. काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ॥

अर्थ

कावळा काळा, कोकिळ पण काळा. कावळा आणि कोकिळेत फरक काय? वसंत ‌ऋतु आल्यावर मात्र कावळा तो कावळा आणि कोकिळ तो कोकिळ. (वसंत ‌ऋतुचे कोकिळ गोड आवाजात स्वागत करतो, त्यावेळी दोघांमधील फरक लक्षात येतो).

टीप :-
प्रथमदर्शनी सज्जन आणि दुर्जन सारखेच दिसतात पण त्यांच्याशी व्यवहार केल्यावर मग खरं चांगला कोण ते समजते.

४९. विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परपीडनाय ।

४९. विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परपीडनाय ।
खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥

अर्थ

वाईट माणसे विद्या भांडण करण्यासाठी, धन गर्व करण्यासाठी आणि बळ दुसर्‍यांना त्रास देण्यासाठी वापरतात. सज्जन माणसांचे मात्र ह्याच्या एकदम विरुद्ध असते. (विद्या) ज्ञानदानासाठी, (धन) देण्यासाठी आणि (बळ) दुसर्‍यांच्या रक्षणासाठी असते. (येथे कवीने यथासांख्य या अलंकाराचा सुंदर उपयोग केला आहे)

४८. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् ।

४८. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् ।
अन्यदेहविलसत्परितापात सज्जनो द्रवति नो नवनीतम् ॥

अर्थ

सज्जनांचे हृदय लोण्यासारखे असते असे कवि म्हणतात ते खोटे आहे. (कारण) दुसर्‍याला होणार्‍या दुःखामुळे सज्जन पाघळतो पण लोणी नाही.

४७. अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।

४७. अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम् ॥

अर्थ

आळशी माणसाला विद्या कशी मिळणार, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला संपत्ती कशी मिळणार, ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला मित्र कुठून आणि मित्र नसलेल्याला सुख कसे मिळणार? (थोडक्यात आळशी माणसाला सुख मिळणे अवघड आहे).

Wednesday, April 7, 2010

४६. न स्थातव्यं न गन्तव्यं क्षणमप्यधमै: सह |

४६. न स्थातव्यं न गन्तव्यं क्षणमप्यधमै: सह |
पयोऽपि शौण्डिकीहस्ते वारुणीत्यभिधीयते ||

अर्थ

[माणसाने ] क्षणभर सुद्धा नीच लोकांबरोबर थांबू नये किंवा [कोठे] जाऊ नये. कलालाच्या [दारु बनवणारा] हातात दूध असलं तरी [लोक] त्याला दारूच म्हणतात.

४५. ग्रहाणां चरितं स्वप्नोऽ निमित्तान्युपयाचितम् |

४५. ग्रहाणां चरितं स्वप्नोऽ निमित्तान्युपयाचितम् |
फलन्ति काकतालीयं प्राज्ञास्तेभ्यो न बिभ्यति ||

अर्थ

[कुंडलीतील] ग्रहांचे फेरे, [पडलेली] स्वप्न, शकून किंवा अपशकून आणि नवस हे कावळ्याने बसल्यावर फांदी मोडावी त्याप्रमाणे [योगायोगाने] फलद्रुप होतात बुध्दिमान माणसे त्यांना घाबरत नाहीत.

४४. यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |

४४. यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : ||

अर्थ

जीवनात सुखेनैव जगावे. गरज पडल्यास कर्ज काढून तूपरोटी खावी. एकदा देहाची राख झाल्यावर परत कोण येणार आहे?
हा चार्वाकाचा श्लोक असून त्यात संपूर्ण इहवादी तत्वज्ञान सांगितले आहे.

४३. भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहम् त्वत् प्रसादतः ।

४३. भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहम् त्वत् प्रसादतः ।
पश्याम्यहं जगत् सर्वम् न मां पश्यति कश्चन ॥

अर्थ

हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेमुळे मी सिद्ध झालो आहे. (कारण) मी सगळ्या जगाला बघु शकतो पण मला कोणीच पाहु शकत नाही. (गरीब माणसाकडे कोणी लक्ष देत नाही म्हणुन एका भिकारी माणसाने केलेला हा विचार आहे)

४२. क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।

४२. क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।
अतृणे पतितो वन्हिः स्वयमेवोपशाम्यति ॥

अर्थ

क्षमा हेच ज्यांचे शस्त्र आहे त्यांना (क्षमाशील माणसांना) वाईट माणसे काय करणार? (ज्याप्रमाणे) गवत नसलेल्या जमिनीवर पडलेली (लागलेली) आग आपोआप विझून जाते.

४१. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् ।

४१. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् ।
येन केन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत ॥

अर्थ

मडके फोडावे, कपडे फाडावेत (किंवा) गाढवावर बसावे (पण) या ना त्याप्रकारे माणसाने प्रसिद्ध व्हावे.

४०. चिन्तनीया हि विपदां आदावेव प्रतिक्रिया ।

४०. चिन्तनीया हि विपदां आदावेव प्रतिक्रिया ।
न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वन्हिना गृहे ॥


अर्थ

संकटाचा (संकटातुन सुटण्याचा) विचार (संकट येण्याच्या) आधीच करावा.(जसे) घर पेटल्यावर विहीर खणण्याचा काय उपयोग?

३९. अमंत्रम्‌ अक्षरं नास्ति

३९. अमंत्रम्‌ अक्षरं नास्ति
नस्तिमूलमनौषध‍म्‌।
अयोग्यः पुरुषः नास्ति
योजकस्तत्र दुर्लभः॥

अर्थ

मंत्रात ज्याचा उपयोग करता येत नाही असे एकही अक्षर नाही. ज्याच्यात औषधी गुणधर्म नाहीत अशी एकही मूळी नाही. सर्वथः अयोग्य असा कोणीही पुरुष नाही तर दुर्लभ काय आहे तर योजक. [म्हणजे ह्या सगळ्यांचा योग्य उपयोग करणारा माणूस मिळणे दुर्लभ आहे. ]

Tuesday, April 6, 2010

३८. भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलै: जलदागमे |

३८. भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलै: जलदागमे |
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ||

अर्थ

हा अन्योक्ती अलंकार असलेला श्लोक आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला कोकिळांनी मौन धारण केले ते फार चांगले झाले. कारण पावसाळ्याच्या सुरवातीला जेंव्हा बेडूक [डराव डराव असा घाणेरडया आवाजात ] बडबड करतात, तेंव्हा गप्प बसणेच चांगले. [जेंव्हा सामान्य बुद्धीची माणसे खूप बडबड करतात तेंव्हा प्रतिभावंतानी गप्प बसणेच चांगले. कारण त्यांची झेप सामान्यांना कळणार नाही. ]

३७. निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फटा|

३७. निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फटा|
विषं स्यात्‌ यदि वा न स्यात्‌ फटाटोपो भयङकर :||

अर्थ

साप बिनविषारी असला तरी त्याने मोठा फणा उगारावा विषारी असो किंवा नसो उभारलेला फणा भयंकर दिसतो [त्यामुळे सापाला स्वतःचे संरक्षण करता येईल तो जरी बिनविषारी असला तरी ]

३६. वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत: |

३६. वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत: |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्   ||

अर्थ

जेव्हा वणवा लागतो तेव्हा वारा तो पसरवण्यासाठी अग्नीला सहाय्य करतो. पण तोच वारा छोट्या दिव्याला मात्र क्षणात विझवून टाकतो. खरचं दुर्बलांशी कोणी मैत्री करत नाही.

३५. अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।

३५. अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानाम् तु वसुधैव कुटुम्बकम् ॥

अर्थ

हा आपला तो परका असा भेदभाव हलक्यामनाची माणसे करतात. परंतु थोर माणसांसाठी (संपूर्ण) पृथ्वी परिवाराप्रमाणे असते.

३४. अश्वम्‌ नैव गजम्‌ नैव व्याघ्रम्‌ नैव च नैव च।

३४. अश्वम्‌ नैव गजम्‌ नैव व्याघ्रम्‌ नैव च नैव च।
अजपुत्राम्‌ बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक :||

अर्थ

घोड्याचा बळी देत नाहित, हत्तीचा बळी देत नाहित, वाघाचा तर कधीच नाही. बोकड मात्र बळी जातो, [कारण] देव हा दुर्बळांचा घात करणार आहे. [ देव देखिल दुर्बळांचे रक्षण करत नाही.]

३३. यौवनम् धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता |

३३. यौवनम् धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||

अर्थ

तारुण्य, संपत्ती, प्रभुत्व आणि अविवेक यातिल एक एक गोष्ट देखिल विनाशाला कारणीभूत होते, मग जिथे चारही गोष्टी एकत्र असतील तर त्याची काय कथा?

३२. गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेऽपि वसतां सताम् ।

३२. गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुम् स्वयमायान्ति षट्पदाः ॥

अर्थ

ज्याप्रमाणे केवड्याच्या वासामुळे भुंगे त्याच्याकडे आकर्षित होतात, त्याप्रमाणे चांगल्या माणसांचे गुण त्यांची थोरवी दुरवर पसरवतात.

Monday, April 5, 2010

३१. लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् |

३१. लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् |
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||

अर्थ

पुत्र पाच वर्षाचा होई पर्यंत त्याचे लाड करावेत. पुढील दहा वर्षे होईपर्यंत मारावे.[शिस्त लावावी या अर्थाने] परंतु सोळा वर्षाचा झाल्यावर मात्र त्याला मित्राप्रमाणे वागवावे.

Hindi Translation:

पुत्र जब तक पाँच वर्ष का हो, तब तक उसका लाड़ करना चाहिए। अगले दस वर्ष तक उसे अनुशासन में रखना चाहिए (मारना मतलब शिस्त सिखाना)। लेकिन जब वह सोलह वर्ष का हो जाए, तो उसे मित्र की तरह व्यवहार करना चाहिए।

English Translation:

One should pamper a son until he turns five. For the next ten years, he should be disciplined (meaning to instill discipline, not literal punishment). However, once he turns sixteen, he should be treated like a friend.

३०. कमले कमला शेते हरश्शेते हिमालये।

३०. कमले कमला शेते हरश्शेते हिमालये।
क्षीराब्धौ च हरिश्शेते मन्ये मत्कुणशङकया ||

अर्थ

लक्ष्मी कमळावर निद्रा करते तर शंकर हिमालयात. समुद्र हे विष्णूचे निद्रास्थान. हे सर्व केवळ एका ढेकणाच्या भीतीने ?[की काय? असे कवीला वाटते.]

Hindi Translation:

लक्ष्मी कमल पर सोती हैं, तो शंकर हिमालय में। समुद्र विष्णु का शय्यास्थान है। यह सब सिर्फ एक खटमल के डर से?
क्या ऐसा कवि को लगता है?

English Translation:

Lakshmi sleeps on the lotus, while Shiva sleeps in the Himalayas. The ocean is Vishnu’s resting place. Is all this just because of fear of a bedbug?
Is this what the poet thinks?

२९. वैद्यराज नम: तुभ्यं यमज्येष्ठसहोदर:|

२९. वैद्यराज नम: तुभ्यं यमज्येष्ठसहोदर:|
यमस्तु हरते प्राणान् त्वं तु प्राणान् धनान्यपि ||

अर्थ

हे वैद्यराज, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही तर यमाचे मोठे भाऊच. यम प्राण हरण करतो पण तुम्ही प्राण आणि धन या दोन्हींचे हरण करतां.

Hindi Translation:

हे वैद्यराज, आपको नमस्कार हो। आप तो यमराज के बड़े भाई ही हैं। यमराज केवल प्राण हरते हैं, लेकिन आप तो प्राण और धन दोनों ही हर लेते हैं।

English Translation:

O respected physician, greetings to you. You are indeed the elder brother of Yama (the god of death). Yama only takes away life, but you take away both life and wealth.

२८. अहं च त्वं च राजेन्द्र लोकनाथावुभावपि |

२८. अहं च त्वं च राजेन्द्र लोकनाथावुभावपि |
बहुव्रीहि: अहम् राजन् षष्ठीतत्पुरुषो भवान् ||

अर्थ

राजाची स्तुती मोठ्या चातुर्याने करण्याचा प्रयत्न कवीने केला आहे.
हे राजा, तू आणि मी दोघेही लोकनाथ आहोत. फरक इतकाच की मी बहुव्रीहि आहे [लोक ज्याचे नाथ आहेत असा] आणि तू षष्ठीत्तपुरुष आहेस. [लोकांचा नाथ]

Hindi translation:
राजा की स्तुति बड़ी चतुराई से करने का प्रयास कवि ने किया है।
हे राजा, तुम और मैं दोनों ही लोकनाथ हैं। फर्क इतना है कि मैं बहुव्रीहि हूँ (लोक जिनका स्वामी है वह), और तुम षष्ठीत्तपुरुष हो (लोक का स्वामी)।

English translation:
The poet has skillfully tried to praise the king.
O king, you and I are both Loknath. The only difference is that I am Bahuvrihi (one whom people have as master), and you are Shashthi Tatpurusha (master of the people).

२७. चलत्येकेन पादेन तिष्ठत्यन्येन बुद्धिमा‍न्‌ |

२७. चलत्येकेन पादेन तिष्ठत्यन्येन बुद्धिमान्‌ |
नासमीक्ष्य परम् स्थानम् पूर्वमायतनम् त्यजेत् ||

अर्थ

बुद्धिमान मनुष्य एकच पाऊल [पुढे] टाकतो. एक तसेच [आहे त्या जागीच ] ठेवतो. पुढच्या जागेची [धंदा किंवा नोकरी यांची ] नीट परीक्षा केल्याशिवाय पहिली जागा सोडू नये.

Hindi translation:
बुद्धिमान मनुष्य एक ही कदम आगे बढ़ाता है। एक कदम वैसे का वैसे (वहीं पर) रखता है। आगे की जगह (काम या नौकरी) की अच्छी तरह से जांच-पड़ताल किए बिना पहली जगह नहीं छोड़नी चाहिए।


English translation:
An intelligent person takes only one step forward. He keeps the other foot in the same place. One should not leave the first place (job or business) without thoroughly examining the next opportunity.

२६. भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः ।

२६. भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः ।
कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥

अर्थ

जेवण झाल्यावर कोणते पेय प्यावे (ताक)? जयन्त हा कोणाचा मुलगा आहे (इन्द्राचा)? विष्णुपद मिळण्यास कसे आहे (अतिशय अवघड)? ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड.

टीप :-
समस्या प्रकारचा हा श्लोक आहे राजदरबारामध्ये कवींना चवथा चरण देऊन श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होती. ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड (तक्रम शक्रस्य दुर्लभं) हे वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.

Hindi translation:
खाना खाने के बाद कौन सा पेय पीना चाहिए (छाछ)? जयन्त किसका पुत्र है (इन्द्र का)? विष्णुपद पाना कैसा है (बहुत कठिन)? छाछ इन्द्र को (पाने के लिए) बहुत कठिन है।

टीप :-
यह समस्या प्रकार का श्लोक है।

English translation:
After a meal, which drink should one have (buttermilk)? Whose son is Jayanta (Indra's)? How difficult is it to attain Vishnupada (extremely difficult)? Buttermilk is extremely difficult for Indra (to get).

Note:
This verse is of the riddle variety.

२५. कस्तुरी जायते कस्मात् को हन्ति करिणाम् शतम् ।

२५. कस्तुरी जायते कस्मात् को हन्ति करिणाम् शतम् ।
भीरुः करोति किं युद्धे मृगात् सिंहः पलायते ॥

अर्थ

कस्तुरी कोणापासून मिळते (हरणापासून)? शंभर हत्तींना कोण मारतो (सिंह)? भित्रा युद्धामधे काय करतो (पळून जातो)? हरिणापासून सिंह पळून जातो.

टीप :-
समस्या प्रकारचा हा श्लोक आहे राजदरबारामध्ये कवीना चौथा चरण देऊन श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होती. हरीण सिंहाला पळवून लावते हे वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.

Hindi translation:

कस्तूरी किससे मिलती है? (हरिण से)।
सौ हाथियों को कौन मारता है? (सिंह)।
भयभीत व्यक्ति युद्ध में क्या करता है? (भाग जाता है)।
क्या सिंह हरिण से भागता है?

यह एक पहेली प्रकार का श्लोक है। राजदरबार में कवियों की परीक्षा इस प्रकार होती थी कि उन्हें श्लोक का चौथा चरण दिया जाता था और शेष तीन चरणों की रचना करनी होती थी।
"हरिण सिंह को भगा देता है" — इस वाक्य को अर्थपूर्ण बनाने के लिए कवि ने पहले तीन उचित चरणों की रचना की है।

English translation:

From whom is musk obtained? (From a deer).
Who can kill a hundred elephants? (A lion).
What does a coward do in battle? (He runs away).
Does the lion run away from the deer?

This verse is of a riddle-like type. In the royal court, poets were often tested by being given the fourth line of a verse, and they had to compose the first three lines to make it complete.
To give meaning to the line “The deer makes the lion flee,” the poet composed the first three appropriate lines.

Sunday, April 4, 2010

२४. कुलीनै: सह संपर्कम् पण्डितै: सह मित्रताम् |

२४. कुलीनै: सह संपर्कम् पण्डितै: सह मित्रताम् |
ज्ञातिभिश्च समम् मेलम् कुर्वाणो नावसीदति ||

अर्थ

घरंदाज लोकांशी संबंध, विद्वान लोकांशी मैत्री आणि आपल्या गाववाल्यांशी [चांगले] संबंध ठेवणार्‍यांचा [कधी] नाश होत नाही.

Hindi translation:

जो व्यक्ति सम्मानित लोगों से संबंध रखता है, विद्वान लोगों से मित्रता करता है और अपने गाँव के लोगों से अच्छे संबंध बनाए रखता है, उसका कभी नाश नहीं होता।

English translation:

Those who maintain relations with respectable people, make friendship with learned individuals, and keep good relations with their fellow villagers never ever face destruction.

Saturday, April 3, 2010

२३. स्वभावम् नैव मुञचन्ति सन्त: संसर्गतोऽसताम् |

२३. स्वभावम् नैव मुञ्चन्ति सन्त: संसर्गतोऽसताम् |
न त्यजन्ति रुतम्‌ मञ्जु काकसंपर्कत: पिका: ||

अर्थ

दुष्ट लोकांचा सहवास असला तरीही सज्जन माणसे आपला स्वभाव सोडत नाहीत. [चांगलीच वागतात] कावळ्याच्या संगतीत असले तरी कोकीळ आपलं मधुर आवाजातील [कुहूकुहू] टाकून देत नाहीत. [ते कावळ्याप्रमाणे कर्कश ओरडत नाहीत.]

Hindi translation:

दुष्ट लोगों के साथ रहने पर भी सज्जन व्यक्ति अपना स्वभाव नहीं छोड़ते, वे हमेशा अच्छा व्यवहार ही करते हैं।
कोयल, चाहे वह कौओं के साथ रहे, फिर भी अपनी मधुर कुहू–कुहू की आवाज़ नहीं छोड़ती।
वह कौए की तरह कर्कश स्वर में नहीं बोलती।

English translation:

Even in the company of wicked people, good persons do not give up their nature; they continue to behave kindly. A cuckoo, even when among crows, never abandons her sweet kuhu-kuhu song.
She does not caw harshly like a crow.

२२. युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि|

२२. युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि|
युक्तिहीनम् वच: त्याज्यं वृद्धादपि शुकादपि ||

अर्थ

योग्य अशा बोलण्याचा जरी ते [लहान मुलांनी सांगितलं असलं] तरी किंवा पोपटानी सांगितलं असलं तरी [नुसतं ऐकून न समजता बोलणाऱ्याकडून] सु्द्धा स्वीकार करावा. [पण] बोलणे मूर्खपणाचे असेल तर जरी वयस्कर माणसाने सांगितले असले किंवा शुकाचार्यानी [अगदी विद्वान माणसाने] सांगितले तरी ते सोडून द्यावे.

Hindi Translation

योग्य बातें यदि छोटे बच्चे कहें, तो भी या तोते कहें, तो भी उन्हें केवल सुनकर समझे बिना बोलने वाले से भी स्वीकार कर लेनी चाहिए। लेकिन अगर कही गई बात मूर्खतापूर्ण है, तो चाहे वह किसी बुजुर्ग ने कही हो या शुकाचार्य जैसे विद्वान ने कही हो, तब भी उसे छोड़ देना चाहिए.​

English Translation

Even if something appropriate is said by young children or by parrots, it should be accepted—even from someone who simply repeats what they hear without understanding. However, if what is said is foolish, then even if it is spoken by an elder or a highly learned person like Shukacharya, it should be discarded.

Friday, April 2, 2010

२१. उपदेशो हि मूर्खाणाम् प्रकोपायन शान्तये |

२१. उपदेशो हि मूर्खाणाम् प्रकोपाय न शान्तये |
पय: पानम् भुजङगानाम्‌ केवलं विषवर्धनम् ||

अर्थ

[चांगल्या] उपदेशाने सुध्दामूर्ख लोक शान्त न होता अधिकच चिडतात. याला दृष्टांत म्हणजे दूध सापाचे विष फक्त वाढवते,  दुधामुळे सापामधे चांगला फरक काही होत नाही.

Hindi translation:
"अच्छे उपदेश से भी मूर्ख लोग शांत नहीं होते, बल्कि और अधिक क्रोधित हो जाते हैं। इसका उदाहरण यह है कि दूध सांप का विष केवल बढ़ाता है, दूध से सांप में कोई अच्छा परिवर्तन नहीं आता।"

English translation:
"Even good advice fails to calm foolish people; instead, it makes them angrier. The analogy is that milk only increases a snake’s venom—it does not make the snake any better."

Thursday, April 1, 2010

२०. अजरामरवत प्राज्ञ : विद्यामर्थम्‌ च चिन्तयेत् |

२०. अजरामरवत प्राज्ञ : विद्यामर्थम्‌ च चिन्तयेत्  |
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत्  ||

अर्थ

बुद्धिमान माणसाने शिक्षण आणि पैसे यांचा विचार आपण चिरंजीव असल्याप्रमाणे करावा आणि मृत्यूने जणू  काही  केस  पकडले आहेत [तर भीतीने जसा माणूस चांगला वागेल तस] हे समजून धर्माचं  आचरण कराव.

Hindi translation:
"बुद्धिमान व्यक्ति को शिक्षा और धन के बारे में वैसे सोचना चाहिए जैसे वह अमर हो, और धर्म का आचरण वैसे करना चाहिए जैसे मृत्यु ने उसके बाल पकड़ लिए हों और भय से वह व्यक्ति अच्छा आचरण करने लगे।"

English translation:
"A wise person should think about education and wealth as if they were to live forever, and should practice righteousness as if death had already seized them by the hair, prompting them to act virtuously out of fear."

१९. नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।

१९. नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृग्रेन्द्रता ॥

अर्थ

अरण्यामधे सिंहावर राज्याभिषेक किंवा इतर कोणाताहि संस्कार केला जात नाही. स्वतःच्या शौर्याच्या बळावरच त्याला "प्राण्यांचा राजा" ही पदवी मिळते.

Hindi translation:
जंगल में ना तो सिंह का राज्याभिषेक होता है और ना ही कोई अन्य संस्कार। अपने खुद के शौर्य के बल पर ही उसे "जंगली जानवरों का राजा" उपाधि प्राप्त होती है।

English translation:
In the forest, no coronation or ceremonial ritual is performed for the lion. It earns the title "King of the animals" solely by its own valor.

१८. अतिपरीचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति ।

१८. अतिपरीचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनम् कुरुते ॥

अर्थ

(ज्याप्रमाणे) मलयपर्वतावर राहणारी भिल्लिण चंदनाच्या झाडाचा सरपण म्हणून उपयोग करते, (त्याप्रमाणे) जास्त ओळखीमुळे अपमान आणि सारखे (कोणाकडे) गेल्यामुळे मानहानी होते.

Hindi translation:
जिस तरह मलय पर्वत पर रहने वाली भीलन चंदन के वृक्ष का उपयोग ईंधन (जलावन) के रूप में करती है, उसी तरह अत्यधिक परिचय अपमान का कारण बनता है, और बार-बार किसी के पास जाने से प्रतिष्ठा घटती है।

English translation:
Just as the tribal woman living on Mount Malaya uses sandalwood trees for firewood, excessive familiarity leads to disrespect, and repeatedly visiting someone results in loss of honor.